Date: |
जनता बँकेचे अध्यक्ष मा. खळदकर यांचे खातेदारांना आवाहन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात देशहिताच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार सध्या चलनात असलेल्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या असून, त्याऐवजी पाचशे व दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांमध्ये एक प्रकारचे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु नागरिकांनी आणि विशेषत: जनता सहकारी बँकेच्या ग्राहक व खातेदारांनी कोणत्याही प्रकारे गोंधळून न जाता या परिस्थितीत काही काळ संयम बाळगण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मा. श्री. अरविंद खळदकर यांनी केले आहे.
श्री. खळदकर म्हणाले, की 'जनता बँकेच्या खातेदारांनी भ्रमात किंवा कल्पनाविश्वात न राहता या बदलाकडे सकारात्मक पद्धतीने पाहणे आवश्यक आहे. नोटा बदलण्याच्या प्रक्रियेबाबत थोडा विलंब होत असेलही. पण भारतीय रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमावलीनुसार कोणत्याही खातेदाराचे पैसे बुडणार नाहीत, प्रत्येकाला प्रत्येकाच्या वाट्याचे पैसे दिले जाणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने रोख भरणा किंवा पैसे काढण्यावर जे निर्बंध आज घातले आहेत त्यामध्येही कालांतराने बदल होतील आणि देशाची अर्थव्यवस्था पुन्हा मूळ पदावर येईल. खातेदारांनी केवळ संयम बाळगावा, तसेच घाईगडबड न करता व्यवहार करण्याची आवश्यकता आहे.'