Date: |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला. भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवादाला चाप बसविणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश असला, तरी यामुळे अनेक गोष्टींमध्ये सकारात्मक बदल होताना दिसणार आहेत. या निर्णयामुळे काही दिवस देशातील अर्थव्यवस्थेला थोडा-अधिक ताण सहन करावा लागेल. परंतु दूरदृष्टीचा विचार करता यातून भारतीय अर्थव्यवस्था सक्षम होईल. तसेच या अनुषंगाने केलेले नियोजन आणि त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या झाल्यास भारत निश्चितपणे एक आर्थिक महासत्ता म्हणून समोर येईल.
पण हा निर्णय एका रात्रीतून झालेला नाही. यासाठी मागील दोन वर्षांपासून टप्प्याटप्प्याने प्रयत्न होताना दिसतात. 'जन-धन योजने'च्या रूपाने या उद्दात्त धोरणाची सुरुवात झालेली आपल्याला पाहावयास मिळेल. तसेच खात्यावर गॅसचे अनुदान, पीक विमा, पीक अनुदान अशा अनेक गोष्टी थेट जमा होणे, असे निर्णय देखील याच धोरणांचा भाग होते, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
यामुळे देशातील गरिबातील गरीब व्यक्ती बँकेशी जोडली जाईल व भविष्यात एक दिवस ती कॅशलेस बँकिंगला प्राधान्य देताना दिसेल. कोणताही बदल हा पचविणे तितके सोपे नसते, पण त्याचे भविष्यातील परिणाम जर सकारात्मक होणार असतील, तर त्याकडे आपण योग्य दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. सध्या देशभर अशी परिस्थिती दिसते आहे, की सामान्यांना पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाचे कौतुक जरूर आहे, पण दुसरीकडे त्यांना दैनंदिन व्यवहाराची चिंतादेखील सतावते आहे. यासाठी आपण थोडा वेगळा विचार केल्यास ही चिंतादेखील दूर होईल.
पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत दिल्यानंतर त्याबदल्यात बहुतांश वेळा थेट दोन हजार रुपयांच्या नोटा मिळत आहेत (काही बँकांमध्ये पाचशे रुपयांच्या नवीन नोटा उपलब्ध आहेत.) ज्यांना शंभर किंवा पाचशेच्या नोटा मिळत नाहीयेत, त्यांच्यासाठी नवीन दोन हजार रुपयांची नोट हीदेखील अडचणीचीच ठरते आहे. तुम्ही स्वत:च या अडचणीवर मार्ग काढावा, यासाठी जणू सरकारने ही अडचण निर्माण केली आहे. ऑनलाईन बँकिंग हा या अडचणीवरील सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे.
तुमचे खाते असणार्या बँकेचे सद्यःस्थितीला ‘अॅप’ असते किंवा ‘वेबसाईट’ तरी असते. ऑनलाईन व्यवहाराचा ‘आयडी व पासवर्ड’ संबंधित बँकेकडून मिळाल्यावर कोणत्याही प्रकारचे किरकोळ रकमांचे व्यवहार तुम्हाला या ‘अॅप’ किंवा ‘वेबसाईट’च्या माध्यमातून करता येतात. मोबाईल रिचार्ज, लाईट बिल भरणा, कोणत्याही प्रकारचे शॉपिंग इथपासून ते दुसर्याच्या अकाऊंटमध्ये ‘एनईएफटी’, ‘आयएमपीएस’ किंवा ‘आरटीजीएस’द्वारे पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा तुम्हाला सुरक्षित तंत्रज्ञानाच्या आधारे उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सुविधांच्या आधारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बँकांसह अनेक खासगी कंपन्यांनी ‘ई-वॉलेटस्’ सुरू केले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व व्यवहार तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून कोठेही घरबसल्या, कोणत्याही रांगेत न थांबता करू शकता. त्यातही सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवहार अतिशय सुरक्षित असून, त्यामुळे तुमचे कोणत्याही प्रकारचे नुकसान कधीही होत नाही.
याशिवाय तुम्ही जेव्हा बाजारात जाता, तेव्हा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड यांपैकी तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या कार्डच्या साहाय्याने तुम्ही व्यवहार करू शकता. वरीलपैकी एक जरी कार्ड तुमच्याजवळ असेल, तर रोख रक्कम जवळ ठेवण्याची आवश्यकता नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वेगळी दूरदृष्टी ठेवून हा निर्णय घेतला आहे. देश आता ‘कॅशलेस बँकिंग’च्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे, या क्रांतिकारी चळवळीत वरील प्रकारे बँकिंग व्यवहार करून तुम्हीदेखील सहभागी होऊ शकता आणि अभिमानाने म्हणू शकता, की 'होय, मीदेखील ‘कॅशलेस बँकिंग’च्या दिशेने वाटचाल करीत आहे...!'