Date: |
एटीएम केंद्राचे देखील उद्घाटन
सहकारी बँकिंग क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणार्या पुण्यातील जनता सहकारी या मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या ओतूर शाखेचे मंगळवार, १५ नोव्हेंबर २०१६ रोजी नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकृत वास्तूचे उद्घाटन बँकेचे उपाध्यक्ष संजय लेले यांच्या हस्ते, तर येथील नवीन एटीएम केंद्राचे उद्घाटन संचालक बिरू खोमणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बँकेचे संचालक विजय भावे, मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर, संचालक मंडळ सदस्य, सभासद, खातेदार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओतूर शाखेच्या माध्यमातून जनता बँकेच्या विविध सेवा-सुविधा या भागातील नागरिकांना गेली अनेक वर्षे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर यांनी प्रास्ताविकात बँकेविषयी माहिती दिली. या शाखेचे नूतनीकरण करण्यात आले असून, या नूतनीकृत शाखेद्वारे ग्राहकांना आणखी चांगल्या आधुनिक सेवा-सुविधांचा लाभ घेता येणार आहे. ओतूर येथील मान्यवर सर्वश्री नरेंद्र डुंबरे, हेमंत डुंबरे, डॉ. भरत घोलप, माणिकशेट वाळेकर, बाळासाहेब डुंबरे, चंद्रकांत डुंबरे, वैभव तांबे, संतोष तांबे, राजू पन्हाळे आणि रामदास तांबे यांचा बँकेच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राधाकृष्ण लिमये यांनी केले. जनता बँकेची ओतूर शाखा हाऊस नं. ३५४/१, पांढरी मारुती मंदिराजवळ, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे ४१२ ४०९ येथे कार्यरत आहे.
जनता सहकारी बँक ही आर्थिकदृष्ट्या सक्षम बँक असून, बँकेच्या महाराष्ट्र व गुजरात राज्यात ६७ शाखा कार्यरत आहेत. बँकेचा एकूण व्यवसाय (बिझनेस मिक्स) १३ हजार ३०० कोटींपेक्षा अधिक असून, बँकेच्या सर्व शाखांमधून ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एनीव्हेअर बँकिंग, NEFT/RTGS, विमा इत्यादी आधुनिक बँकिंग सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.