Date: |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर सामान्यांच्या जिवावर बेतणारा निर्णय अशा शब्दांमध्ये विरोधकांडून टीकेची झोड उठवली गेली, पण एक अर्थतज्ज्ञ म्हणून नव्हे, तर एक सामान्य नागरिक म्हणून माझे असे स्पष्ट मत आहे, की मोदीजींनी जो निर्णय घेतला तो अचूक असून, त्याची वेळही योग्यच आहे. त्याचबरोबर मोदींच्या कणखर स्वभावामुळेच या निर्णयाच्या माध्यमातून देशात एकप्रकारे अर्थक्रांतीची सुरुवात झाली, असे प्रतिपादन ‘अर्थक्रांती’चे प्रणेते श्री. अनिल बोकील यांनी केले.
श्री. बोकील म्हणाले, “मागील १६ वर्षांपासून आम्ही ‘अर्थक्रांती’चा प्रस्ताव देशभरातील अनेक मान्यवर नेते, पक्ष यांच्यासमोर मांडत आलो आहोत. प्रत्येकजण याबाबत विचार करू, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत.
नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा आम्ही हा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला होता. त्या वेळी ते म्हणाले होते, ‘आम्ही केंद्रात सत्तेत आलो, तर या प्रस्तावाची नक्की अंमलबजावणी करू.’ आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी सत्तेत आल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत हे करून दाखवले. देशासाठी काहीतरी करण्याची या माणसाची धडपड आहे. विशेष म्हणजे ते स्वत: कणखर असल्याने अशा प्रकारचे धाडसी निर्णय ते घेऊ शकतात. शिवाय जनतेनेच त्यांच्या नेतृत्वात स्पष्ट बहुमत दिले आहे. याच जनतेचा विश्वास सार्थकी लावण्यासाठी असे विकासात्मक निर्णय घेणे त्यांना आवश्यक आहे. विमुद्रीकरणाच्या या निर्णयामुळे काही काळ आणीबाणीसदृश परिस्थितीचा आपल्या सर्वांनाच सामना करावा लागेल खरा, पण याचे दूरगामी परिणाम लक्षात घेतले, तर हा निर्णय भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करणाराच आहे.’’
सरकारने घेतलेल्या या एका निर्णयामुळे आम्ही आनंदी झालो आहोत खरे, पण समाधानी मात्र नाही. ‘अर्थक्रांती’च्या पुढील प्रस्तावासाठी आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार आहोत. भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी करप्रणालीमध्ये आमूलाग्र बदल होणे अपेक्षित आहे. कराची रक्कम थेट खातेदाराच्या बँक अकाऊंटमधूनच वळती झाल्यास ते केंद्र, राज्य, तसेच महानगरपालिकांच्या दृष्टीने सोयीचे ठरू शकेल, असे मतही बोकील यांनी या वेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमात श्री. रांका, श्री. खळदकर, श्री. शहा, श्री. चितळे, श्री. प्रभुदेसाई आदी मान्यवरांनीही बोकील यांना विमुद्रीकरण आणि अर्थक्रांतीच्या एकूणच मांडणीबाबत प्रश्न विचारले व बोकील यांनीही या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरेही दिली.
श्री. अनिल बोकील यांनी मांडलेल्या निवडक महत्त्वाच्या मुद्द्यांचे व्हिडिओ -
विमुद्रीकरणाच्या या संपूर्ण प्रक्रियेची खरच गरज होती का? आणि चलनी नोटा बंद करून डिजिटल बँकिंगची आत्ता देशाला गरज आहे का? या समाजमनाच्या प्रश्नांना श्री. अनिल बोकील यांनी दिलेले उत्तर...
सध्याचे देशाचे पंतप्रधान निर्मिती क्षेत्रातूनच पुढे आलेले असल्यामुळे त्यांना सामान्य उद्योजक, व्यावसायिक यांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे आणि त्याच अनुषंगाने ते निर्णय घेत असतात... पाहा, नेमके काय म्हणाले आहेत श्री. बोकील...
श्री. बोकील यांच्या मते भारतीय समाजातील जनमानसाची वृत्ती बदलण्याची आवश्यकता नाही, तर सध्याच्या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होणे आवश्यक आहे...
बाजारपेठ आणि सरकार हे आज व्यवस्थेचे दोन मोठे घटक आहेत. पण या दोन्ही घटकांना समतोल न्याय मिळाला पाहिजे, तसेच व्यक्तिगत प्रगतीला संधी मिळणे गरजेचे आहे. पाहा, नक्की बाजारपेठ व सरकारची मांडणी श्री. बोकील यांनी अशी केली आहे...
अर्थक्रांतीची नेमकी मांडणी काय आहे, देशाची सद्यःपरिस्थिती काय सांगते व भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांची निर्मिती नेमकी कशी होते, या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे श्री. बोकील यांनी खालील व्हिडिओमधून दिली आहेत...
पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचारच कमी करायचा होता, तर त्यांनी दोन हजार रुपयांची नोट का काढली, असा प्रश्न अनेक स्तरांमधून उपस्थित होतो आहे. याचे नेमके आणि अतिशय समर्पक उत्तर श्री. बोकील यांनी दिले आहे...
आजच्या तरुण पिढीला केवळ समस्या सांगून उपयोग नसतो, त्यांना त्यावर उपायदेखील हवा असतो. नवी पिढी उत्तर शोधणारी पिढी आहे. म्हणूनच देशातील आर्थिक समस्येवर श्री. बोकील यांनी ‘अर्थक्रांती’ची मांडणी करून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘देशाला गरज एका अर्थक्रांतीची’ या कार्यक्रमातील सर्वात महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे...
‘अर्थक्रांती’च्या या संपूर्ण प्रक्रियेची अंमलबजावणी टप्प्या टप्प्याने करणे शक्य आहे का, असा महत्त्वपूर्ण प्रश्न जनता बँकेचे अध्यक्ष श्री. अरविंद खळदकर यांनी श्री. अनिल बोकील यांना ‘देशाला गरज एका अर्थक्रांतीची’ या भाषणानंतर झालेल्या प्रश्नोत्तराच्या वेळी विचारला; श्री. बोकील यांनी या प्रश्नाला काय उत्तर दिले आहे ते पहा या व्हिडिओमध्ये...
एखादा चित्रपट अथवा नाटक संपल्यावर ते प्रेक्षकांना खूपच आवडते. काही वेळा ते भावूक होतात किंवा त्यांना समोरच्याने सादर केलेल्या कलेचा अभिमान वाटतो, म्हणून ते उभे राहून टाळ्या वाजवतात.
‘देशाला गरज एका अर्थक्रांतीची’ हा कोणताही मनोरंजनात्मक कार्यक्रम नसूनही कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहता याला आदर म्हणायचे, प्रेक्षक भावूक झाले म्हणायचे, की पुणेकरांनी मोदींनी घेतलेल्या निर्णयाला दर्शविलेला पाठिंबा म्हणायचा, हे आता हा व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा...