Date: |
सभासदांना १० टक्के लाभांशाची शिफारस, चौंडेश्वरी बॅंकेचे विलिनीकरण
पुणे, २७ जून २०१६ - सहकारी बॅंकिंग क्षेत्रात दमदार वाटचाल करणाऱ्या जनता सहकारी बॅंकेला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात (सन २०१५ – २०१६) रूपये ६४.९७ कोटी रूपयांचा निव्वळ नफा झाला असून बॅंकेची एकूण उलाढाल (बिझनेस मिक्स) रूपये १२ हजार ८०५.०५ कोटी रूपयांवर पोचली आहे. वरील आर्थिक वर्षासाठी सभासदांना १० टक्के लाभांशाची शिफारस करण्यात आली. अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष श्री. अरविंद खळदकर यांनी आज येथे दिली.
बॅंकेची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २७ जून २०१६ रोजी बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाली. या सभेत श्री. खळदकर यांनी बॅंकेच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला. सर्वसाधारण सभेला बॅंकेचे उपाध्यक्ष श्री. संजय लेले, संचालक मंडळ सदस्य, मान्यवर सभासद, खातेदार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रगतीचा लक्षणीय टप्पा
बॅंकेचे सन २०१५ -१६ या आर्थिक वर्षातील प्रगतीचा आढावा घेताना श्री. खळदकर म्हणाले की, आपल्या बॅंकेच्या ६७ वर्षाच्या इतिहासात सन २०१५ -१६ हे वर्ष निश्चितच नोंद घेण्याजोगे ठरले आहे. या वर्षात बॅंकेने सर्वच आघाड्यांवर लक्षणीय कामगिरी केली आहे. या वर्षात बॅंकेने १२ हजार ८०५.०५ कोटी रूपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. एकूण ठेवी ६०८.३६ कोटीं रूपयांनी वाढून ७ हजार ६७८.३३ कोटीं रूपयांपर्यंत पोचल्या आहेत. कर्जवाटप ३७५.४५ कोटी रूपयांनी वाढून ५ हजार १२६.७२ कोटीं रूपयांपर्यंत पोचले आहे. क्रेडिट डिपॅाझिट रेशो (सीडी.रेशो) ६६.७० टक्के राहिला. सन २०१५ -१६ मध्ये झालेली वाढ बॅंकिंग व्यवसायातील परिस्थितीशी तुलना केल्यास समाधानकारक आहे.
सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात निव्वळ नफा ६४.९७ कोटींपर्यंत पोचला. (मागील वर्षी ६४.६१ कोटी रूपये) तर एकूण उलाढाल ११ हजार १८२.०५ कोटी रूपयांवरून १२ हजार ८०५.०५ कोटी रूपयांपर्यंत गेली आहे. बॅंकेची `नेटवर्थ` ४७३.०५ कोटी रूपये झाली. तर भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (सीआरऐआर) १३.९७ टक्के इतके राहिले असे श्री. खळदकर यांनी सांगितले.
बॅंकेने २०१५-१६ या आर्थिक वर्षात १० शाखा नव्याने सुरू केल्या आहेत. या नव्या शाखांमुळे मार्च २०१६ अखेर बॅंकेच्या एकूण शाखांची संख्या ५६ इतकी झाली. तर चालू आर्थिक वर्षात (२०१६-१७) आणखी ८ शाखा नव्याने सुरू करण्यात येणार असून त्यापैकी गोरेगाव (मुंबई) आणि अहमदनगर शाखा नुकत्याच कार्यान्वित झाल्या आहेत.
चौंडेश्वरी बँकेचे विलिनीकरण
जनता सहकारी बॅंकेत इचलकरंजी येथील चौंडेश्वरी सहकारी बॅंकेचे विलिनीकरण ४ जुलै २०१६ रोजी होणार आहे. या बॅंकेच्या मुख्य कार्यालयासह ९ शाखा व १ विस्तारित कक्ष सध्या कार्यरत आहेत. या विलिनीकरणानंतर तसेच नव्या शाखा सुरू झाल्यानंतर बॅंकेच्या एकूण शाखांची संख्या ७३ पर्यंत पोहोचणार आहे असे श्री. खळदकर यांनी सांगितले.