विविध घडामोडी
             Date:

    `कासा डिपॉझिट अभियान` मास-जुलै २०१६

    जनता सहकारी बँकेच्या आर्थिक वर्ष २०१६-१७ बचत/चालू खाते अभियान मास (CASA) घेण्यात आले असून त्यासाठी बँकेच्या लातूर शाखेने जुलै महिन्याची निवड केली होती. माहितीपत्रक तसेच ‘एसएमएस’द्वारे तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हे अभियान खातेदारांपर्यंत पोहचविण्यात आले आहे. आणि या अभियानाला लातूर शहर, जिल्हा व परिसरातील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसा नोंदविला.

    गुंतवणूकीबाबत जनजागृती

    जनता सहकारी बँकेच्या लातूर शाखेतर्फे जुलै महिन्यात विमा तसेच म्युच्युअल फंडात गुंतवणूकीबाबत जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाखेतील सर्व खातेदारांना ‘एसएमएस’द्वारे गुंतवणूकीची माहिती देण्यात आली. याआधारे सुमारे २०० हून अधिक खातेदारांनी शाखेला भेट देऊन यासंबंधीची अधिक माहिती घेतली व अशा गुंतवणूक योजनांमध्ये सक्रियरित्या सहभागी होण्याचा मनोदय व्यक्त केला.

     

    एसबीआय, रिलिगेअर, रिलायन्स आदी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी शाखेत उपस्थित राहून म्युअचल फंड व विमा प्रकल्पांची खातेदारांना माहिती दिली. या सुविधेबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

     

    त्यानंतर लातूर शाखेतील केशरबाई भार्गव प्राथमिक विद्यालयातील वीसहून अधिक महिला शिक्षिकांना रिलायन्स म्युच्यअल फंडचे प्रतिनिधी अशोक कंकराजन यांनी माहिती दिली. या उपक्रमातून व्यवसाय वृद्धीस चालना मिळाली आहे.

    सुकुमार चिरंजीव बचत ठेव योजनेला प्रतिसाद

    मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने जनता सहकारी बँकेच्या लातूर शाखेतर्फे ‘कासा डिपॉझिट अभियान मास-जुलै २०१६` अंतर्गत एक आगळी-वेगळी योजना राबविण्यात आली आहे. लातूर शहरातील काही ठराविक विद्यालय, महाविद्यालयांची निवड करून तेथील विद्यार्थ्यांचे सुकुमार-चिरंजीव खाते सुरू करण्यात आले आहेत.

     

    लातूरमधील यशवंतराव विद्यालय, ज्ञानेश्वर विद्यालय, जिजामाता कन्या प्रशाला, परिमल माध्यमिक विद्यालय, गोदावरी देवी लाहोटी कन्या शाळा, जनकल्याण निवासी विद्यालय, दयानंद कला महाविद्यालय यांसार‘या विद्यालय, महाविद्यालयांची निवड यासाठी करण्यात आली होती. या योजनेतून सुमारे ११३ सुकुमार-चिरंजीव बचत खाते नव्याने सुरू करण्यात आली.

     

    डॉक्टर्स व ‘सीएं’ना शुभेच्छा!

    डॉक्टर्स व चार्टर्ड अकाउंटन्ट डे (१जुलै) निमित्ताने जनता सहकारी बँकेतर्फे लातूर शहरातील निवडक डॉक्टर्स व ‘सीएं’ना सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांना गुलाबपुष्प, पेढा व अभियान माहितीपत्रक देण्यात आले. यात २५० हून अधिक डॉक्टर्स व २० हून अधिक ‘सीएं’चा समावेश होता. बँकेचे बचत खाते, चालू खाते तसेच टेक्नोबेस सर्व्हिसेसची माहिती संबंधितांना यावेळी देण्यात आली.

    गडहिंग्लज शाखेत सामान्यांसाठी अनोखी बचत खाते योजना



    कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नुकतीच गडहिंग्लज तालुका कार्यालयात तहसीलदार यांच्यासोबत बैठक घेतली. तालुक्यातील १८३ गावांमधील २००  रेशन धान्य दुकान, गॅस वितरकही यावेळी उपस्थित होते. ‘शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे बँकेत खाते असले पाहिजे’ असा आदेश यावेळी जिल्हाधिकार्यांहनी जारी केला. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर जनता सहकारी बँकेच्या गडहिंग्लज शाखेचे व्यवस्थापक श्री. मंगेश राव यांनी रेशन दुकानदारांकडे बँकेचा अहवाल तसेच विविध योजना सादर केल्या. या अभियानांतर्गत बँकेच्या शाखेतील सेवक हे खाते उघडण्यासाठी शाखेच्या २०  कि.मी. परिघातील गावात जाऊन, विविध ठिकाणी बँकेचा स्टॉल लावून बचत खाते उघडण्यासंदर्भात सामान्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. 8 ऑगस्ट रोजी हलकर्णी गावातून सुरू झालेल्या या योजनेंतर्गत आजपर्यंत ५० हून अधिक बचत खात्यांची सुरूवात करण्यात आली आहे. 

    महिला सक्षमीकरणासाठी विशेष कार्यक्रम

    महिला सक्षमीकरण व जाणीव जागृतीसंदर्भात जनता सहकारी बँक, लातूर, भारतीय स्त्री शक्ती, लातूर व विवेक ज्योती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला आर्थिक सक्षमीकरण’ या विषयावर एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती किशोरी गद्रे यांनी यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन केले. आश्‍विनी मयेकर, अॅड. राजश्री केदार, दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका श्रीमती दिपाली केळकर, भारतीय स्त्री शक्तीच्या डॉ. सौ. ज्योत्स्ना कुकडे, पुणे जनता बँकेच्या संचालिका डॉ. मधुरा कसबेकर, बँकेचे शाखाधिकारी चंद्रशेखर प्रभुणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना श्रीमती गद्रे म्हणाल्या की, “महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यांचा लाभ घेऊन आर्थिक बाबतीत निर्णय घेण्यासाठी त्यांनी अधिक सक्षम होणे गरजेचे आहे.’’