Date: |
सण-उत्सव सुरू झाले की चाहूल लागते ती नव्या खरेदीची... बाजारपेठ, कंपन्या ही यादृष्टीने तयारी करतातच आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी उत्पादने, ऑफरची घोषणा करायला सुरुवात करतात. वर्तनामपत्र, रेडिओ, टीव्ही आणि हो आता सोशल मीडियावरूनही जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न होतो. बाजारपेठेतील या गोष्टींची घरात, मित्रांबरोबर चर्चा नाही झाली तर नवलंच.
बदलणारे तंत्रज्ञान, फीचर्स तसेच आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची असणारी स्थिती पाहता कार, टू व्हीलरवरच घरात, मित्रांबरोबर चर्चा सुरू होते. अर्थात, आता वाहन खरेदी करणे आधी पेक्षा सोपं झाले आहे. बहुतेक कंपन्या बँकांबरोबर कर्ज सुविधा उपलब्ध करून देतात.
कारच्या बाजारपेठेत नजर टाकल्यास अगदी एंट्री लेव्हल म्हणजे अडीच लाख ते कोटी रुपयांपर्यंतच्या कार उपलब्ध असून, गेल्या काही दिवसांत अडीच लाख ते तीस लाख रुपयांपर्यंतच्या कारची अनेक नवी मॉडेल बाजारात आली आहेत. यात कोणते पर्याय आहेत हे पाहुयात.
`एंट्री लेव्हल`
अडीच लाख ते साडेतीन लाख रुपयांपर्यंतच्या आणि चार व्यक्ति कारमध्ये व्यवस्थित बसू शकतील, अशा कारला एंट्री लेव्हल कार वा स्मॉल कार म्हणतात. अर्थात, जागतिक पातळीवर अशा कारचा सेगमेंटच अस्तित्वात नाही. आपल्याकडे या सेगमेंटमध्ये टाटा नॅनो, मारुती अल्टो 800, रेनॉ क्विड, डॅटसन रेडी गो (निस्सान ब्रँड), ह्युंदाई ईऑन अशा कारचा समावेश आहे. स्पर्धेमुळे या कारमधील फीचरमध्ये आमूलाग्र बदल झाला असून, तंत्रज्ञान, सेफ्टीचा विचार होऊ लागला आहे. टाटा नॅनो ही कार शहरासाठी उत्तम असली तरी हायवेवरही उत्तम कामगिरी करते.
पॉवर स्टिअरिंग, एसी, पॉवर विंडोज, डिस्कब्रेक आदींनी सुसज्ज आहे. तसेच, कारचे प्रति किलोमीटर मायलेज २० असल्याचा दावा कंपनीचा आहे. मर्यादित बजेट व एएमटी घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही कार उत्तम पर्याय आहे.
या सेगमेंटमधील गेल्या अनेक वर्षांपासूनची दावेदार अल्टो ८०० असली तरी रेनॉ क्विड कारमुळे चांगली स्पर्धा निर्माण झाली आहे. तसेच, डॅटसन रेडी गो ही नवी कार नुकतीच काही महिन्यांपर्वी बाजारात आली आहे. अल्टो ८०० मध्ये काही बदल करून नवे मॉडेल बाजारात आले आहे. यामध्ये ड्रायव्हर एअर बॅग, म्युझिक सिस्टिम, नवी इंटेरियरचा समावेश आहे. मात्र, हा तरुण ग्राहकांना भावणारा बदल नाही. क्विडचे डिझाइन हे डस्टर या एसयूव्हीपासून प्रेरित आहे. त्यामुळे ही कार या सेगमेंटमध्ये आकर्षक दिसते. रेनॉमध्ये नॅव्हिगेशन, ड्युएल एअरबॅग, डिस्कब्रेक, एसी, पॉवर विंडो आदी पर्याय उपलब्ध आहेत. 'रेडी गो'मध्येही अशी फीचर आहेत. डिझाइन टॉल बॉय प्रकारचा असल्याने ही कार उंच वाटते. मात्र या ब्रँडच्या डॅटसन गो कारला प्रतिसाद मिळालेला नाही. याच सेगमेंट ह्युंदाईची ईऑन कार असून, कारमध्ये ईपीएस, एअरबॅग, म्युझिक सिस्टिम, एसी, पॉवर विंडोज पर्याय आहेत. ह्युंदाईच्या अन्य कारच्या तुलनेत ही कार यशस्वी ठरलेली नाही. त्यामुळे या सेगमेंटमध्ये प्रमुख पर्याय अल्टो ८०० व क्विड आहे. या सर्व कारना (नॅनो वगळता) आठशे सीसीचे इंजिन आहे.
`स्मॉल कार`
सर्वसाधारणपणे या सेगमेंटमधील कार साडेतीन लाख रुपयांपासून सुरू होतात व यांना एक हजार सीसीचे इंजिन असते. अल्टो के १० व क्विड १००० या दोनच कार या सेगमेंटमध्ये आहेत. अल्टो के १० सर्व्हिस नेटवर्क, लो कॉस्ट ओनरशिपमुळे उजवीच वाटते. अर्थात, या कारपेक्षा क्विडचे डिझाइन चांगले असून, या मागे रेनॉचे तंत्रज्ञान आहे. क्विड १००० सीसीमधील फीचर म्हणजे पॉवर स्टिअरिंग, एसीट, अॅडजेस्ट होणारे स्टिअरिंग, एअर बॅग आदी पाहता या कारला यश मिळू शकते. पण तरीही भारतीय ग्राहक स्मॉल कार घेताना सर्वप्रथम मारुती सुझुकी च्या गाड्यांचा विचार करतो.
`हॅचबॅक`
हा सेगमेंट निर्माण करण्याचे श्रेय मारुती सुझुकीला जाते. स्विफ्ट कारमधील फीचरमुळे थोडे अधिक पैसे खर्च करण्याची तयारी असणाऱ्यांना आकर्षित केले. त्यानंतर अनेक कंपन्यांना या सेगमेंटनी खुणावले. ह्युंदाईने अनेक वर्षांनी 'ग्रँड आय-१०' लाँच केली. त्या आधी या सगेमेंटमधील कार म्हणून 'आय-१०' ग्राहकांपुढे सादर केली जात होती. टाटा मोटर्सने इंडिका व्हिस्टा लाँच केली. स्विफ्टमध्ये इंजिनाची बांधणी, बाह्य रचना, अंतर्गत रचना, नवी फीचर (एबीएस, ईबीडी, एअरबॅग, नॅव्हिगेशन सिस्टिम, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल) आदींचा समावेश आहे. ग्रँड आय-१० चा लुक चांगला असून, एबीएस, एअरबॅग्स, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल फीचरही यात आहेत. या कारचे मायलेज प्रति लिटर २० केएमपीएलच्या आसपास आहे. तसेच, होंडाची ब्रिओ आणि टोयोटाची ईटीऑस लिव्हा, टाटा मोटर्सची बोल्ट या कारचाही तुम्ही विचार करू शकता. सेगमेंटमधील कारच्या किमती साडेचार लाख रुपयांपासून पुढे आहेत.
`प्रिमियम हॅचबॅक`
हा सेगमेंटमध्ये होंडाच्या जॅझ ह्युंदाईच्या 'आय २०' कारला ग्राहकांची मागणी आहे. मारुती सुझुकीनेही आता या सेगमेंटवर लक्ष केंद्रित करून नवे प्रोडक्ट निर्माण केले मात्र, नाव जुन्या कारचेच दिले ते म्हणजे 'बलोनो'. आकार फीचर, मायलेज, किंमत, डिझाइन आदींबाबत बलोनो सरस ठरली. या सेगमेंटमध्ये होंडाने पुन्हा नव्या रूपात जॅझ कार लाँच केली आहे. फियाटही पुंटो आणि अर्बन क्रॉस कारच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. या कारच्या किमती साडेपाच लाख रुपयांपासून पुढे आहेत आणि मायलेज प्रति लिटर २० केएमपीएलच्या आसपास आहे.
`सेदान सेगमेंट`
देशातील मध्यवर्गींची वाढती क्रयशक्ती पाहून महागड्या सेदान सेंगमेंटला पर्याय म्हणून मारुती सुझुकीने स्विफ्ट डिझायर कार लाँच केली. मोठी डिक्की, प्रति लिटर २० केएमपीएल मायलेज, टेप आदींसह सुरुवातीस लाँच झालेल्या स्विफ्ट डिझायरमध्ये बदल झाले. सध्याची स्विफ्ट डिझायरची डिक्की पहिल्या मॉडेलच्या तुलनेत थोडी लहान आहे. पण, कारचे मायलेज वाढले आहेत. तसेच, कारचे इंजिन नवे असून, एबीएस, ईपीएस, एअरबॅग्स, पॉवर विंडोज, सेंट्रल लॉकिंग, पुश बटन स्टार्ट आदी फीचरचा समावेश करण्यात आला आहे. या सेगमेंटमध्ये टोयोटाची ईटीऑस, टाटा मोटर्सची झेस्ट आहे.