अर्थजागर
    ‘एनईएफटी’ कशी कराल?
             Date:


    दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा हद्दपार करण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पेट्रोल पंप, टपाल कार्यालये, बँका इथे सुरू झालेल्या रांगा हा दुसरा ‘हिट’ विषय बनला होता. आता तुम्ही म्हणाल, इतक्या प्रदीर्घ आणि चावून चोथा झालेल्या विषयावर आता नवीन काय सांगणार?

    खरंतर अजूनही ग्राहकांना बँकेकडून काय सोयी-सुविधा मिळू शकतात? खातेदारांना नवीन खाते उघडल्यावर लगेचच कोणाला तातडीने पैसे द्यायचे असतील, तर त्यासाठी कोणकोणते मार्ग असू शकतात.

     बँकेने उपलब्ध करून दिलेल्या सेवांची माहिती सर्वांना असतेच असे नाही. तेव्हा आपल्या खात्यातील रक्कम आपल्याला कशी वापरता येऊ शकते याबाबत आपण माहिती घेऊया.

     

    1. आपल्या बँक खात्यामधील रक्कम इंटरनेट बँकिंग सुविधेशिवाय इतर खात्यांमध्ये खातेदाराच्या विनंतीनुसार वळती करण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये उपलब्ध आहे. या सुविधेला एन.ई.एफ.टी. म्हणजेच ‘नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर’ या नावाने ओळखले जाते. या प्रक्रियेसाठी धनादेश असणे आवश्यक आहे.

    2. आपल्या खात्यामधील रक्कम आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही खात्यामध्ये नाममात्र शुल्कात तातडीने वळती करण्यासाठी ही सुविधा वापरली जाऊ शकते.

    3. यासाठी आपले खाते ज्या बँकेत आहे तिच्या जवळील शाखेत प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी विभाग किंवा संबंधित विभागातून एन.ई.एफ.टी.चा फॉर्म भरावा लागतो.

    4. यामध्ये ज्या खात्यात पैसे भरायचे आहेत, ती बँक, शाखा, खाते नंबर, त्याचा पत्ता, मोबाईल नंबर (आवश्यक), ई-मेल आयडी आणि एकूण रक्कम अशी माहिती त्या फॉर्ममध्ये भरून द्यावी लागते. सोबतच आपल्या बँक खात्याचा नंबर, शाखा, पत्ता, मोबाईल नंबर (आवश्यक), ई-मेल आयडी अशी प्राथमिक माहिती प्रत्यक्ष भरावी लागते.

    5. या सुविधेनुसार एकाच बँकेत अथवा इतर बँकेच्या खात्यात पैसे जमा अथवा वळते करता येतात, पाठविता येतात.

    6. एन.ई.एफ.टी.चा फॉर्म भरल्यावर बँक अधिकारी आपण भरलेल्या अर्जाच्या आधारे 2 तासांच्या अवधीत पैसे वळते करतात.

    7. शनिवार, रविवार, स्थानिक व शासकीय सुट्ट्या वगळता इतर दिवशी बँकेच्या वेळेत एन.ई.एफ.टी.ची प्रक्रिया करता येते.

    8. देशांतर्गत कोणत्याही बँकेतील खात्यात आवश्यक रक्कम ट्रान्स्फर करण्यावर प्रतिबंध नसून, केवळ भारताबाहेर नेपाळमध्ये पैसे पाठवायचे असतील, तर दरदिवशी रुपये 50 हजारांची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.