राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने
             Date:


     

    राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह या वर्षी दि. 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2017 दरम्यान साजरा करण्यात आला. अनेक स्वयंसेवी संस्था, शासकीय विभाग, निमशासकीय संस्था नावीन्यपूर्णरीत्या जनजागृतीचे कार्य करीत आहेत. समाजाने या अभियानात अधिकाधिक सक्रिय झाले पाहिजे.

     

    दरवर्षी होणार्‍या अपघातांची तीव्रता समजून घेण्यासाठी आपण पुढील आकडेवारी पाहूया...

    सन 2015 मध्ये तेरा प्रमुख राज्यांमध्ये झालेल्या अपघातांची संख्या खरंच काळजी करावी इतकी अधिक आहे. यामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक असून, 2015 मध्ये तब्बल 63 हजार 805 मृत्यू केवळ रस्ता अपघातात नोंदविले गेले आहेत. तमिळनाडू राज्यात सर्वाधिक अपघात झाले आहेत. त्यांनतर 

    मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो. एका वर्षात संपूर्ण भारतात तब्बल 5 लाख अपघात नोंदविले गेले आहेत. यामध्ये 1 लाख 46 हजार नागरिकांचे आयुष्य धोक्यात आले आहे, तर याच्या तीन पट नागरिक जखमी आहेत. यामधील वाढत जाणारी संख्या पाहता, फक्त यामध्ये आकडेवारीनुसारच नाही, तर दीर्घकालीन परिणामसुद्धा गंभीर आहेत, याचा अधिक विचार झाला पाहिजे.

     

    हे सारे टाळायचे, तर आपण काय करू शकतो?

    1. आपल्या घराच्या किंवा ऑफिसच्या पार्किंगसाठी उपलब्ध जागेचा विचार करून त्यानुसार योग्य ते वाहन वापरू शकतो. यासाठी मी ‘बॉस’ आहे, मग टू व्हीलर कशी वापरू, असा विचार करणे आपण बदलायला हवे.
    2. एकाच दिशेला जायचेय, मग आपण काहीजण सोबत जाऊ शकतो का? किंवा ‘आज माझ्या गाडीवरून जाऊया, उद्या तुझी गाडी वापरायची बरं!’ असं आपल्याला थोडे समजून घेता येईल का, याचा विचार केला पाहिजे.
    3. आपल्यात अनेकजण असे आहेत जे ‘जाऊदे, गाडी जुनी झालीय’, असे म्हणतात पण नवी गाडी घ्यायचा विचारही करीत नाहीत. इतर अनेक गोष्टींवर बराच खर्च करतील, पण एखादा दिवस राखीव ठेवून गाडीच्या तब्येतीची बिलकूल काळजी घेणार नाहीत. मग गाडीसुद्धा वैतागून मोठा विचार करते आणि घाईच्या वेळी दगा देते.
    4. गाडी देखभालीसाठीचा खर्च सहज कमी होऊ शकतो. यामध्ये आपल्या वेळेचा, नियोजनाचा आणि अंमलबजावणीचा ‘परफेक्ट प्लॅन’ करावा लागेल. किंवा यानंतरचा पर्याय म्हणजे म्हणजे जुन्या वाहनाच्या बदल्यात नवे वाहन विकत घेता येईल, ज्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत निश्‍चितच घट होऊ शकेल.