खातेदारांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन
पुणे, १८ ऑक्टोबर २०१९ : विश्वसनीय व्यवहारांद्वारे अनेक कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्या जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे ने आपला ७० वा वर्धापनदिन शुक्रवार दि.१८ ऑक्टोबर रोजी उत्साहात साजरा केला. या प्रसंगी जनता बँकेच्या वतीने राज्यातील खातेदारांना सोमवार २१ ऑक्टोबर रोजी शंभर टक्के मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करा असे आगळेवेगळे आवाहन देखील यावेळी केले. ही माहिती बँकेचे अध्यक्ष संजय लेले यांनी आज येथे दिली.
यानिमित्ताने बँकेच्या मुख्य कार्यालयात व सर्व ७१ शाखांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुंतवणूक दिवस, ग्राहक मेळावा, दिवाळी कर्ज योजना व डिजिटल पेमेंट बाबत माहिती देण्यात आली. यावेळी क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री.संजय लेले, पद्मविभूषण शिवशाहीर मा.बाबासाहेब पुरंदरे, उपाध्यक्ष श्री.माधव माटे, सीईओ श्री.जयंत काकतकर, संचालक मंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि ग्राहकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
बँकेचे अध्यक्ष संजय लेले आणि सर्व संचालक मंडळाला व कर्मचारी वर्गाला उपस्थित ग्राहकांनी शुभेच्छा दिल्या. श्री लेले म्हणाले की, आधुनिक सेवासुविधांव्दारे असंख्य कुटुंबांशी आपुलकीचे नातं जोडणारी बँक म्हणून जनता बँक जनमानसात ओळखली जाते. बँकेच्या सभासद, ठेवीदार, हितचिंतक व ग्राहकांनी आजपर्यंत बँकेवर केलेल्या प्रेमामुळे बँकेने विविध आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भविष्यात देखील बँकेची वाटचाल अशाच पद्धतीने होईल असा मला विश्वास वाटतो.
जनता सहकारी बँक लि., पुणेच्या महाराष्ट्र व गुजरात राज्यात ७१ शाखा कार्यरत असून बँकेची एकुण उलाढाल रूपये १४००० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामध्ये ८८०० कोटींच्या ठेवी आणि रूपये ५२०० कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. बँकेचा स्वनिधी रूपये ४०० कोटी असून बँकेची सरकारी कर्ज रोख्यांतील गुंतवणूक ३५०० कोटी आहे.