शेअर बाजार तळ, अच्छा है...

03 Dec 2016 14:19:00

 

डिसेंबरमध्ये सेन्सेक्सच्या ३० हजारांच्या उद्दिष्टाचे आकडे जवळपास अनेत तज्ज्ञ, वित्तसंस्था, दलाल पेढ्यांमार्फत मांडले जात असतानाच सेन्सेक्स नोव्हेंबरमध्ये अगदी २६ हजारांच्याही खाली येऊन ठेपला. निफ्टीचा प्रवास ८ हजारांखाली झाला. खरंतर २०१६ अखेरपर्यंतचे मुंबई ​शेअर बाजार निर्देशांकाचे ३० हजारांचे आकडे दृष्टिक्षेपात नाहीत, याची चाहूल बाजारात महत्त्वाचा मानल्या जाणा​ऱ्या संव​त्सर मुहूर्तालाच लागली होती. उलट दिवाळीतील टप्प्यापासून बाजार नोव्हेंबरपर्यंत खूपच दूर गेला.   



केंद्र सरकारचे ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचे धोरण, अमेरिका, ब्रिटनसह आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि त्यातच डॉलरपुढे रुपयाने ६९ पर्यंत टाकलेली नांगी, असे काही घटक बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांना त्यांच्या तळात घेऊन जाण्यास कारणीभूत ठरले.


सातव्या वेतन आयोगामुळे होणारा खर्च, चांगल्या मॉन्सूनमुळे वाढणारी क्रयशक्ती, सावरलेली महागाई असे परिणाम दिसू लागण्यापूर्वीच कंपन्यांचे सुमार तिमाही वित्तीय निष्कर्ष आणि त्यातच नोटा ​रद्द करण्याचा निर्णय यामुळे बाजारात ​मोठी संभ्रमावस्था निर्माण झा​ली. परिणामी विदेशी गुंतवणूकदारांनीही येथून काढता पाय घेतला. असे असले तरी खरेदीदारांसाठी, नव्याने अथवा अधिक गुंतवणूक करणा​ऱ्यांसाठी सध्याची संधी चांगली असल्याचे सांगितले जाते. गेल्या काही दिवसांतील देशांतर्गत घडामोडींचा परिणाम एकूणच अर्थव्यवस्थेवर पुढील किमान दोन तिमाही जाणवणार असल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील बाजाराकडे नव्याने वळण्याचा हा उत्तम कालावधी असल्याचे यातील तज्ज्ञ छातीठोकपणे सांगतात.

​या क्षेत्राबाबत विचार करावयाचा झाल्यास सध्या बँक क्षेत्रच अधिक चर्चेत आहे. अर्थात नोटा रद्द ​करण्याच्या निर्णयप्रक्रियेत सर्वाधिक लाभ याच गटाला होणार आहे. वाढत्या बुडीत कर्जाचा सामना सध्या या क्षेत्रातील सरकारी, खासगी अशा सर्वच बँकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीतही सरकारी बँकांना मार्च २०१७ पर्यंत ताळेबंद स्वच्छ करण्यास सांगण्यात आले आहे. नोटाबंदीमुळे बँकांकडे अतिरिक्त निधीचा ओघ वाढला आहे. तुलनेत बुडीत कर्जवसुलीला प्रतिसाद कमी आहे. मात्र वाढत्या निधी ओघामुळे बँकांना अधिक कर्जवितरण करणे सुलभ होणार आहे. त्यातच ठेवींवरील व्याजदर कमी करत जात असल्यामुळे बँकांचा खर्चही कमी होणार आहे. परिणामी बँकांची आर्थिक स्थिती काहीशी सुधारण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत बँक क्षेत्र हा गुंतवणुकीचा एक प्राधान्यक्रम असू शकतो.

 

- रवींद्र वाशिमकर

(लेखात व्यक्त केले​ल्या मतांशी बँक सहमत असेलच असे नाही. ही म​ते लेखकाचा अभ्यास व त्याने तज्ज्ञांसोबत केलेल्या चर्चेवर आधारित असून, कोणत्याही गुंतवणुकीसाठीची जोखीम गुंतवणूकदारांनी स्वत: घ्यावयाची आहे.)

Powered By Sangraha 9.0