महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन
पुणे - जनता सहकारी बँक पुणेच्या सहकार्याने सजग नागरी मंचचे अध्यक्ष व करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी लिहिलेल्या दहावी नंतरची शाखा निवड या पुस्तकाचे प्रकाशन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्या हस्ते दिनांक १३ जुन २०१६ रोजी करण्यात आले. याप्रसंगी जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय लेले, पुस्तकाचे लेखक विवेक वेलणकर, महानगरपालिका शिक्षण मंडळ (माध्यमिक) प्रमुख शाम दौंडकर, जनता सहकारी बँकेच्या नियोजन विभागाचे प्रमुख राधाकृष्ण लिमये आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधून यंदाचे वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना हे पुस्तक गुणपत्रिकेसह लवकरच भेट म्हणून दिले जाणार आहे. दहावी नंतर पुढे काय या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न या पुस्तकाव्दारे करण्यात आला आहे. या पुस्तकामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी, यासारख्या अभ्यासक्रमाबरोबरच गृहविज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम, मोफत अभियांत्रिकी अभ्यासक्रम, मोफत व्यवसाय शिक्षण याबाबतची माहिती देण्यात आली आहे. याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या कौशल्य शिक्षणावर आधारित योजनांच्या माहितीचा देखील समावेश करण्यात आला आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांबरोबरच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनादेखील हे पुस्तक भेट म्हणून दिले जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक नक्कीच दिशादर्शक ठरेल. अशी आशा उपस्थितांनी व्यक्त केली.