नीताताई आपल्या कामासाठी गावी जात होत्या. गावाकडचा प्रवास असल्याने डोंगरवाटामध्ये त्यांच्या मोबाईलला पाहिजे अशी रेंज न्हवती. फोन केला किंवा आला की नीट बोलले किंवा ऐकले जात न्हवते. नीताताईंना असाच एक फोन आला. त्या आता गावांत पोहोचल्या होत्या. फोनवरील मुलगा नीताताईंना म्हणाला “मॅडम, मी बँकेतून बोलतोय, तुमच्या बँक अकाँटच्या कार्डचा प्रॉब्लेम झालाय. तुमची माहिती बँकेत पूर्ण नाहीए. प्लीज तुमचा आधार नंबर आणि बँक डीटेल्स द्या. मी तुमची सर्व माहिती पूर्ण करतो.”
नीताताईंनी आपली माहिती देण्यासाठी पर्समधून आपले कार्डस काढले आणि त्या बोलू लागणार तेव्हड्यात त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी आलेला संजय तिथे आला. “अगं, रस्त्यात काय काढतेस बॅगेतून?” त्याने विचारले. तेव्हा नीताताईंनी त्यांना आलेल्या फोनबद्दल सांगितलं. संजयने अतिशय सावधपणे ही फसवणूक असल्याचं त्यांना समजून सांगितलं.
नीताताईंच्या बाबतीत नशिबाने संजय तिथे पोहोचला. पण प्रत्येकाच्याच बाबतीत असे घडेलच. याची खात्री नाही. तेव्हा आपणच सावध आणि सुरक्षित राहून आपले बँक खाते सुरक्षित कसे राहील याची खबरदारी घेऊया. फसव्या जाहीराती, फोन कॉल्स आणि ऑनलाईन पेमेंट करताना अतिशय काळजीपुर्वक आणि विचार करुन व्यवहार करुया.
सामान्य नागरिकांनी स्वकष्टाने कमावलेल्या पैशांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. बनावट योजनांद्वारे होणाऱ्या फसवणूकीतून सामान्यांचे नुकसान होवू नये या उद्देशाने केंद्र सरकार काम करत आहे अशी माहिती केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतीच बंगलोर इथं थिंकर्स फोरम या कार्यक्रमादरम्यान दिली.
विविध ॲप्सच्या माध्यातून जास्त व्याजदर देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यासाठी सामान्य नागरिकांना आवाहन केले जाते. अगदी आकर्षक भाषेत फसवणूक करणारे बोलतात आणि या ॲप्सला (Apps) सबस्क्राईब करायला सांगतात. गरजू असणारा कुणीही व्यक्ती कमी कालावधीत जास्त परतावा मिळण्याच्या आमिषाला भूलतो आणि या फसवणूकीच्या जाळ्यात अडकतो.
सामान्य नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी भारतीय रिझर्व बँक आणि केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवित असतात.
नव्या विधेयकांतर्गत सेबीचे नियंत्रण नसलेल्या सर्व गुंतवणूक योजना समाविष्ट केल्या आहेत. अशा समूह गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून लाखो रुपये गोळा करणाऱ्या व्यक्तींमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार फसवले जाऊ नयेत, यासाठी सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या विधेयकांतर्गत फसव्या योजना राबवणाऱ्यास किमान एक वर्षाच्या कैदेची तरतूद आहे. कैदेची मुदत वाढवून पाच वर्षांपर्यंत केली जाऊ शकेल. या कैदेबरोबर घेण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम १० लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. सातत्याने पॉन्झी योजना राबवणाऱ्यांना मात्र किमान पाच वर्षांची कैद तर कमाल दहा वर्षांची कैद आणि ५० कोटी रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाणार आहे.
फसव्या योजना राबवल्यास आता दंडासह कैद होणार आहे. अशा योजना राबवून गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्याने आता या योजना राबवणाऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीच्या संचालकांना १० वर्षांच्या तुरुंगवासाच्या आणि ५० कोटी रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेचा प्रस्ताव केंद्र सरकारने तयार केला आहे. या मसुद्यात आंतरमंत्रीय गटाने 2016 मध्ये मंजुरी दिली आहे.
- फसवणूक कशी होते
१. फसवणूक करणारे Quikr, OLX यांसारख्या इतर साइटवर तुमच्या विक्रीच्या सूचीवर प्रतिसाद देतात. फसवणूक करणारे ; तुम्ही OLX, Quikr किंवा इतर साइटवर टाकलेली उत्पादनांची सूची पाहतात आणि ते उत्पादन घेण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगून तुम्हाला कॉल करतात. तसेच ते स्वतः येऊन पेमेंट करू शकत नसल्यामुळे ते PhonePe ॲप च्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करू इच्छित असल्याचे सांगतात. ते सैन्यात, पोलिस किंवा सरकारी कर्मचारी असल्याचे सांगून त्यांची खोटी ओळख देऊ शकतात.
फसवणूक करणारे नंतर तुम्ही कॉलवर असताना तुम्हाला PhonePe ॲप उघडण्यास सांगतात, आणि कलेक्ट-कॉल विनंती पाठवतात. बरेच वेळा फसवणूक करणारी व्यक्ती, त्याच्या प्रोफाइलवर PhonePe चा लोगो वापरतात, जो तुम्हाला कलेक्ट कॉल विनंतीवर दिसतो. तसेच ते ‘पेमेंट करा’ बटणाच्या अगदी वर ‘तुम्ही एकदा पेमेंट केल्यावर, तुम्हाला पैसे प्राप्त होतील’ असा सूचनेचा संदेश सुद्धा टाकतात.
हा फसवा संदेश आहे. नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला PhonePe वर पैसे प्राप्त करण्यासाठी कधीच ‘पेमेंट करा’ वर क्लिक करण्याची किंवा तुमचा UPI पिन टाकण्याची गरज नसते.
२. फसवणूकीच्या दुसऱ्या प्रकारात फसवणूक करणारे Flipkart, Myntra यांसारख्या कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याची बतावणी करतात.
अशा घटनांमध्ये, फसवणूक करणाऱ्या व्यक्ती सामान्यतः फोन करतात आणि तुम्ही पैसे जिंकल्याचे सांगून तुमचे अभिनंदन करतात आणि हे पैसे त्यांना Flipkart, PhonePe किंवा कोणत्याही इतर तृतीय-पक्षाच्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत असे तुम्हाला सांगतात. तसेच तुम्ही कोणत्याही वस्तुची खरेदी करू शकता आणि ही खरेदी त्यांच्याकडून सक्षम केली जाईल असे सुद्धा ते कॉलवर असतानाच तुम्हाला सांगू शकतात. कृपया लक्षात ठेवा, कोणतीही कंपनी किंवा व्यापारी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला कलेक्ट-कॉल विनंती पाठवणार नाही किंवा तुमच्यावतीने खरेदी करत नाही.
3. PhonePe ग्राहक सहाय्यताचे प्रतिनिधी असल्याचे भासवून केली जाणारी फसवणूक:
अशा घटनांमध्ये फसवणूक करणाऱ्या व्यक्ती ॲपवर पैसे ट्रान्सफर, कॅशबॅक, KYC , इत्यादींशी संबंधीत कोणत्याही समस्यांचे निवारण करण्यासाठी बनावट मदत वाहिनी क्रमांक Twitter वर देतात. या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर फसवणूक करणारे बँक अकांऊटची माहिती मिळवतात आणि अकांऊटमधील पैसे काढून घेतात.
तुम्हाला जर पैशांची गरज असेल आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कर्ज घेतले असेल तर सावधगिरी बाळगा. कर्ज देणाऱ्या अप्लिकेशनच्या माध्यमातून अनेक ग्राहकांची लूट केली जात असते.
काही दिवसांपुर्वी ही बातमी वृत्तपत्रांत प्रकाशित झाली होती.
गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप्लिकेशनवरून (Loan Application) लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai Police) तपास करत आहे. या तपासादरम्यान एक धक्कादायक सत्य पोलिसांच्या समोर आले आहे. लोकांना कर्जाच्या नावाखाली गंडा घालण्यामध्ये परदेशातून संस्था चालवणाऱ्या लोकांचा हात असून ऑनलाइन कर्ज ॲप्लिकेशनद्वारे लोकांची फसवणूक करत करोडो रुपयांचे क्रिप्टोकरन्सीची (crypto currency) अर्थात आभासी चलन खरेदी केले गेले जात असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या वेळी 18 जणांना अटक केली असून त्यांच्या चौकशीत अनेक खुलासे झाले आहेत.
४. UPI द्वारे होणारी फसवणूक-
काही वेळा अशी परिस्थिती असते कि आपल्याला अशी एखादी व्यक्ती भेटेल की जी आपल्याला पेमेंट करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगू शकते. अनेक फसवणूक करणारे आपणाला “ रिक्वेस्ट मनी ” अशी लिंक पाठवतात, त्यावर क्लिक केल्यावर पैसे मिळण्याऐवजी आपल्या खात्यातून रक्कम कमी होते.
याशिवाय, फसवणूक करणारे बँक प्रतिनिधी म्हणून किंवा विमा प्रतिनिधी आहे असे सांगून आपला OTP/UPI पिन शेअर करण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
एकदा आपण OTP/UPI पिन शेअर केल्यानंतर ते व्यवहार सहज करू शकतात आणि आपल्या खात्यातून पैसे चोरू शकतात.
दैनंदिन आयुष्यात आपण कोणत्या ना कोणत्या वस्तू खरेदी करत असतो. या अर्थाने आपण सर्वजण एक ग्राहक आहोत. ही खरेदी किंवा सेवा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. जर आपण व्यावसायिक हेतूसाठी कोणतेही उत्पादन किंवा सेवा खरेदी केली असल्यास आपण ग्राहक होत नाही.
ग्राहक संरक्षण कायदा 1986.
ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी हा कायदा अस्तित्वात आला. ग्राहक म्हणून लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे.
1. योग्य उत्पादन निवडताना योग्य किंमतीला घेण्याची खबरदारी घ्या
2. अधिकृत संस्थेकडून प्रमाणित वस्तू खरेदी करा.
3. वस्तूंवर आयएसआय चिन्ह (ISI Mark), कृषी उत्पादनांवर एजीमार्क (AGMARK), दागिन्यांवरील हॉलमार्क (Hallmark) इत्यादींची चिन्हे बघून घेणे आवश्यक आहे.
4. मूल्य, वजन, कालबाह्यता, तारखेची माहिती मिळविण्यासाठी लेबल काळजीपूर्वक वाचा.
5. कॅश मेमो, पावती, बिल व्यवसायिक विक्रेत्याकडून घेणे सर्वात महत्वाचे आहे.
कोणताही खरेदी करताना सावध राहा. फसवणूक करणाऱ्या एसएमएस आणि फोनकॉल्सला प्रत्युत्तर न देण्याचा मंत्र ऑनलाईन खरेदी करताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपण सर्वजण सावध राहू, सुरक्षित राहू.