संजय कुलकर्णी
समुपदेशक
समुपदेशनासाठी येणाऱ्या बहुतांश पालकांच्या, मुलांच्या वागण्याबाबत काही अगदी समान तक्रारी असतात, मग तो विद्यार्थी आठवी-नववीतील असो, बारावीतील असो किंवा बारावीच्या पुढील उच्च शिक्षण घेणारा असो!
- आमचा मुलगा/मुलगी सकाळी लवकर उठून अभ्यास करत नाही,
- कॉटवर झोपून अभ्यास करतो, अभ्यास करताना ताठ बसून अभ्यास करावा, असे आम्हाला वाटते,
- त्याच्या लक्षातच रहात नाही, स्मरणशक्ती कमी आहे,
- सिली मिस्टेक्स होतात त्यामुळे हक्काचे मार्क जातात,
- ‘‘अभ्यासाला बस’’ म्हणले की चिडचिड करतो,
- सोप्या आणि आवडत्या विषयांचाच अभ्यास करतो, अवघड विषयांच्या अभ्यासाची टाळाटाळ करतो,
- मोबाईल, व्हॉट्स- अॅप, याचे फार वेड आहे, काय करावे, कसे होणार, तेच कळत नाही...
सामान्यपणे हे आणि असेच अनेक प्रश्न पालकांच्या समोर असतात. यावरून पालक आणि विद्यार्थ्यांमधे मतभेद, वादावादी, सुरू असते. त्यामुळे याच विषयाची काही कारणे व त्यावरील काही उपाय, थोडे विस्ताराने मांडण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्याच्या वागण्याशी, अभ्यासाशी निगडीत या आणि अशा सर्व समस्यांचा संबंध थेट आपल्या मनाशी आणि मेंदूशी असतो, कसा ते पाहू...
आपल्या मनात आल्यानुसार आनंदाने किंवा नाइलाजाने मेंदू आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी शरीराला आदेश देत असतो, त्यामुळे एखाद्या कृतीतून आनंद मिळतो का त्याचा त्रास होतो, हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. आपल्या रोजच्या व्यवहारातील एक उदाहरण घेऊ...
घरातले पाणी संपले आहे म्हणून आईने तळमजल्यावरून एक बादली पाणी आणायला सांगितले तर ‘आईने सांगितले म्हणून’ आपण खालून पाणी आणतोही, पण मनापासून पाणी भरण्याची इच्छा नसल्यामुळे त्या कामाचा आनंद मिळत नाही. ‘‘वा... आज एक बादली पाणी खालून वर आणले, काय मजा आली!’’ असे वाटत नाही, परंतू दुसऱ्याच दिवशी आपण मित्रांबरोबर सिंहगडावर जातो. एक बादलीच्या वजनाइतकी, म्हणजे दहा किलोची सॅक पाठीवर असते. घराचा एक मजला जर पंधरा फूटाचा धरला तर सिंहगड त्यापेक्षा किमान शंभर पट उंच असतो. म्हणजे गणिताच्या भाषेत सांगायचे तर, दहा किलो वजन उचलून पंधरा फूट वर नेले, तेव्हा त्या कामाचा मनाला त्रास झाला, पण तेव्हढेच वजन पंधराशे फूट वर नेले तेव्हा - सिंहगड चढल्यावर - ‘‘काय मजा आली!’’, असे वाटले... या दोन्ही कृतींमधे फरक काय होता तर, पहिली पाणी भरण्याची कृती ‘आईने संगितले होते म्हणून,’ आपण नाइलाजास्तव केलेली होती, त्यामुळे मेंदूकडे तसा संदेश गेल्याने त्रास झाला पण, दुसरी कृती आपण ठरविल्याने, स्वत:च्या इच्छेखातर केल्याने त्यापेक्षा शंभरपट अधिक कष्ट करून सुद्धा त्यात आनंद मिळाला, कारण तसा संदेश आपल्या मनाकडून मेंदूकडे गेला होता! आपला मेंदू दोन्ही स्थितीत काम करतोच, शरिराला काम करायला लावतोच, पण प्रश्न आहे तो मानसिकतेचा जी आपल्या मनावर अवलंबून असते.
‘‘अभ्यास कर म्हणले की चिडचिड होते’’ अशी पालकांची तक्रार असते त्याचे हेच कारण आहे की, जोपर्यंत ‘‘हा अभ्यास मला करायचा आहे, मला माझे करियर घडवायचे आहे, हे मी करू शकतो / शकते आणि मी करणारच आहे, मला जमणार आहे’’, अशी सकारात्मक मानसिकता विद्यार्थ्याच्या मनात निर्माण होत नाही, तोपर्यंत अभ्यासाचे ओझेच होणार, अभ्यास म्हणजे त्रास वाटणार. ’आपण आई बाबांसाठी अभ्यास करतो आहोत,’ असे वाटत राहिले तर बादलीभर पाणी वरच्या मजल्यावर नेण्याच्या त्रासाचीच भावना राहणार, परंतू सकारात्मक दृष्टीने अभ्यासाकडे पाहिलेत तर अभ्यासाचे ओझे न होता, ती ‘आईची कटकट’ न वाटता जास्त अभ्यास होईल आणि त्याचा आनंदही घेता येईल!
समजा क्लासला जायला उशीर झाला आहे आणि तुम्ही रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या बाजूला पाणिपुरीची गाडी दिसते. आपल्या डोक्यात, मनात, क्लासचाच विचार असेल तर पाणिपुरीची गाडी दिसली तरी तोंडाला पाणी सुटत नाही पण, संध्याकाळी पुन्हा त्याच रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या बाजूला पाणिपुरीची गाडी दिसली आणि मनात पाणिपुरी खाण्याची इच्छा निर्माण झाली की लगेच तोंडाला पाणी सुटतेच! असे का होते? पाणिपुरीची गाडी पाहून तोंडाला पाणी सुटले नाही, तर पाणिपुरी खाण्याच्या इच्छेमुळे तोंडाला पाणी सुटले कारण ती मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी मेंदू लगेच आपल्या शरीराची सिध्दता करायला लागतो, त्यासाठी पूरक अवस्था तयार करायला लागतो, तोंडाला पाणी सुटणे हे त्याचेच लक्षण आहे.
आपण पाहिले की, आपला मेंदू आपल्या मनातील विचार कृतीत आणण्यासाठी शरीराला आज्ञा देतो, शरीर कृती करू लागते. आता आपण गादीवर झोपून अभ्यास करतो तेव्हा काय होते? आपण गादीवर झोपलो की स्वाभाविक मेंदूकडे संदेश जातो की, ‘आता झोपायचे आहे’ आणि मेंदू त्यासाठी शरीराला तयार करू लागतो, पण आपण लगेच अभ्यासाचे पुस्तक घेऊन वाचायला अभ्यासाला लागतो, आता झोपायचे का अभ्यास करायचा असा स्वाभाविक संभ्रम सुरू होतो, आणि थोड्याच वेळात झोप यायला लागते. त्यामुळे टेबलावर बसून अभ्यास करण्यात आणि झोपून अभ्यास करण्यात गुणात्मक फरक राहतो.
अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे, आपले मन आणि त्यामुळे मेंदू नेहेमीच सोपे, कमी त्रासाचे, आवडीचेच पर्याय निवडत असतात उदा.- समोर लिफ्ट असेल तर आपण जिने चढण्याचा विचार करीत नाही, ‘‘कोणती भाजी करू?’’ या प्रश्नाला कधीही ‘‘कार्ल्याची भाजी करा’’ असा पर्याय देत नाही, कारण शक्यतो सोपा आवडता पर्याय निवडण्याचा सहज स्वभाव असतो. परिणामत: अभ्यास करतानाही आपण शक्यतो आवडता, कमी त्रासाचा, सहज समजणारा विषय निवडतो. नाइलाजास्तव शेवटी अवघड विषयाला हात घालतो पण, तोपर्यंत आपला मेंदू बराच वेळ अभ्यास करून थकलेला असतो, आता त्या स्थितीत पुन्हा अवघड-म्हणजे मेंदूला ताण देणारा-विषय समोर, मग मेंदू ’हँग’ होतो, शब्द फिरू लागतात, जांभया येऊ लागतात, झोप येऊ लागते, थोडक्यात ‘बोअर’ होतं कारण, मनाकडून मेंदूकडे ‘‘नाइलाजास्तव हे करायचे आहे’’ असा संदेश गेलेला असतो. सोपा उपाय हा की, मेंदू जेव्हा ताजातवाना असतो, अभ्यासाचा आपल्याला मूड असतो तेव्हा मनापासून ठरवून, अवघड विषयाचा अभ्यास करा. निश्चित चांगला परिणाम दिसेल ........जर मनापासून कराल तर!
’सिली मिस्टेक्स’ (टाळता येणाऱ्या अक्षम्य चुका) ही समस्यासुध्दा अशीच आहे. कधी चालताना आपण ठेचकाळतो, कधी जिना चढताना उतरताना पायरीवर अडखळून पडतो, याचे कारण पायाची गती, मेंदूकडून पायाला दिले जाणारे आदेश आणि मनाचे त्यावरील नियंत्रण यात तफावत होते. तसेच हाताची लिहीण्याची गती, मनात प्रश्नांच्या उत्तराविषयी सुरू असलेले विचार आणि मेंदू हाताला देत असणारे संदेश, यात तफावत झाली की ’सिली मिस्टेक्स’ होतात. हे सर्व सुरळीत चालू असले की भराभर प्रश्न आणि पेपर सुटू लागतो परंतू यामधे कुठेही विचारांचा किंवा कृतीचा वेग कमी जास्त झाला की ताळमेळ बिघडतो आणि ’सिली मिस्टेक्स’ होतात! त्यामुळे ’सिली मिस्टेक्स’ टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे मन स्थिर ठेवणे, जे काम करतो आहोत, किंवा जो अभ्यास करतो आहोत त्यामधे पूर्ण लक्ष केंद्रित करणे. विषयाचा पुरेसा अभ्यास झालेला असेल तर प्रश्न सोडविताना विचारांचा वेग, लिहिण्याच्या वेगापेक्षा कमी पडत नाही आणि ’सिली मिस्टेक्स’ कमी होतात.
आपल्या मेंदूची क्षमता कल्पनातीत असते आणि तिचा किती वापर करायचा हेही आपल्या मनावरच अवलंबून असते, त्यामुळे सतत आपल्या मनात सकारात्मक विचार ठेवून आपण जितके आपल्या मेंदूला काम देऊ, तितका तो कार्यक्षम राहतो आणि त्याची काम करण्याची क्षमता सुध्दा दिवसेंदिवस वाढत राहते. थोडक्यात आपल्या मनाचा आणि मेंदूचा सकारात्मक संबंध ठेवा. हेच यशाचे गमक आहे, मग येणारी स्पर्धा कितीही तीव्र असो!