व्हॉट्स अॅपची जीआयएफ ईमेज आपला फोन हॅक करू शकते...

Cybercrime Awareness Blog    27-Dec-2019
Total Views |


WhatsApp _1  H  
 
व्हॉट्स अॅपवरून हल्ली सर्रास पाठविला जाणारा जीआयएफ इमेज (GIF Image) तुमचा स्मार्टफोन अगदी सहजगत्या हॅक करू शकतो. जीआयएफ इमेजमध्ये मालवेअर असते. हा एक ट्रोजन हॉर्स मालवेअरचा प्रकारच म्हणावा लागेल... सायबर गुन्हे व त्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर आधारित जनता सहकारी बँकेच्या ‘सायबर क्राईम अवेअरनेस’ या लेखमालिकेतील ‘जीआयएफ इमेज’ (GIF Image) बद्दल माहिती देणारा हा तिसरा लेख...
.
...........................................................

संवाद साधण्यासाठी, मेसेज पाठविण्यासाठी सध्या व्हॉट्स अॅप मेसेजिंग (WhatsApp Messaging) या अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या अॅपचा वापर होण्यामागचे कारण काय, तर ह्याच्याद्वारे फोटो, स्कॅन केलेली कागदपत्रे इत्यादी गोष्टी पाठवणे सोपे झाले आहे. त्यामुळे दररोज काही ना काही कारणांनी आपण आपल्या नातेवाईक, सहकारी, मित्र-मैत्रिणी यांना संदेश पाठवत असतो. त्यामध्ये अभिनंदन, वाढदिवसाच्या शुभेच्छा, सण-उत्सवाच्या शुभेच्छा अशा प्रकारच्या भावना व्यक्त करणाऱ्या मेसेजेसचा समावेश असतो. काही वेळा अशा प्रकारचे मेसेजेस पाठविण्यासाठी शब्द वापरले जातात, तर काही वेळा वेगवेगळ्या इमेजेस पाठवल्या जातात. या इमेजेसमध्ये जीआयएफ इमेजचा (GIF Image) समावेश होतो.

आपण अनाहूतपणे फॉरवर्ड केलेला किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीने आपल्याला पाठविलेला गुड मॉर्निंग, हॅपी बर्थडे, किंवा मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा देणारा, जीआयएफ इमेज (GIF Image) असलेला मेसेज आपला स्मार्टफोन हॅक करू शकतो. त्याचे कारण जीआयएफ इमेजमध्ये मालवेअर असते. हा एक ट्रोजन हॉर्स मालवेअरचा प्रकारच म्हणावा लागेल.

जेव्हा मालवेअर असलेला जीआयएफ इमेज मेसेज आपल्या व्हॉट्स अॅप मेसेजिंग अॅपमध्ये असतो, तोपर्यंत आपल्या स्मार्टफोनला कोणताही धोका नसतो. परंतु तीच जीआयएफ इमेज आपल्या मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये डाऊनलोड होते आणि आपण ती पाहण्यासाठी त्यावर क्लिक करतो, तेव्हा त्या इमेजला जोडून आलेला मालवेअर फोनवर स्थापित होतो. असा स्थापित झालेला मालवेअर अन्य ठिकाणाहूनही सक्रीय केला जाऊ शकतो. मालवेअर सक्रीय झाल्यानंतर आपल्या मोबाईलमधील माहिती मिळविण्यासाठी तो तुम्हाला फोनमधील विविध अॅप व फोल्डर्समध्ये प्रवेश मिळविण्यासाठी परवानग्या मागण्यास सुरुवात करतो आणि आपण अनाहुतपणे त्या परवानग्या देऊन टाकतो. असे झाल्याने मालवेअरला फोनवरील उपलब्ध सर्व माहितीवर नियंत्रण मिळवता येते व अशी मालवेअरच्या मदतीने गोळा झालेली माहिती आपल्या नकळत हॅकरला मिळते.

जीआयएफ इमेजद्वारे स्थापित झालेले मालवेअर अँड्रॉइड ८.१ आणि ९.० वर चालू असलेल्या व्हॉट्सअॅप आवृत्ती २.१९.२३० आणि त्यापेक्षा जुन्या आवृत्त्यांना प्रभावित करतो.

 

काय काळजी घ्यावी :-

१. वेळोवेळी अॅपसंदर्भातील उपलब्ध होणारे अपडेट्स त्वरित इन्स्टॉल करून घ्यावेत.
२. आपल्या मोबाईलला पेड अॅन्टीव्हायरस सॉफ्टवेअर (क्विक हिल, ई-स्कॅन इत्यादी..) इन्स्टॉल करून घ्यावे.
३. मोफत उपलब्ध असलेले अॅन्टीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू नये. त्यामध्ये मर्यादित सुविधा उपलब्ध असल्याने त्याचा उपयोग मर्यादित प्रमाणात उपयोग होतो.
४. व्हॉट्स अॅपद्वारे डाउनलोड केलेली इमेज योग्यरीत्या स्कॅन करावी, शंका असल्यास ती त्वरित हटवावी.
५. आपल्या मोबाईलवरून अशा प्रकारची इमेज पाठवली गेली असल्यास ज्यांना ती पाठविली आहे त्यांना त्वरित सदर इमेज डिलिट करण्यास सांगून अन्यत्र न पाठविण्याबाबत सूचित करावे.
६. खात्रीलायक वेबसाईट वरूनच जीआयएफ इमेज डाऊनलोड कराव्यात.