युपीआय (UPI) च्या कलेक्ट रिक्वेस्टवरून फसवणूक

Cybercrime Awareness Blog    31-Dec-2019
Total Views |
 

UPI_1  H x W: 0
 
 
युपीआय अॅपमधून पैसे पाठवता अथवा परत घेता येऊ शकतात. या प्रक्रियेत असे लक्षात आले, की युपीआयची कलेक्ट रिक्वेस्ट (Collect Request) ही सुविधा फसवणूक करण्यासाठी वापरण्यात येत आहे. सायबर गुन्हे व त्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर आधारित जनता सहकारी बँकेच्या ‘सायबर क्राईम अवेअरनेस’ या लेखमालिकेतील ‘कलेक्ट रिक्वेस्ट फसवणूक’बद्दल माहिती देणारा हा सहावा लेख...  
 
एनपीसीआय (NPCI - National Payments Corporation of India)ने युपीआय (UPI -Unified Payment Interface) ही प्रणाली बाजारात आणली, जिथे एकाच अॅपमध्ये एकाच मोबाईल नंबरला लिंक असलेली विविध बँकांची सर्व खाती जोडता येतील. युपीआय अॅपला नोंदणी केल्यावर एक आभासी आय़डी (virtual id) तयार होतो. बहुतांश वेळेस हा, मोबाईल नंबर@app handle असा असतो. अॅप हँडल (app handle) म्हणजे प्रत्येक अॅपची त्याला एनपीसीआय ने दिलेली ओळख. मेल आयडी जसा @gmail, @yahoomail असतो तसा युपीआय आयडी हा 91XXXXXX89@JSB OR 93XXXXXX12@OKHDFC असा असतो. 
 
या युपीआय अॅपमधून पैसे पाठवता (Send transaction) अथवा परत घेता (Transaction throughCollect Request) येऊ शकतात. या प्रक्रियेत असे लक्षात आले, की युपीआयची कलेक्ट रिक्वेस्ट (Collect Request) ही सुविधा फसवणूक करण्यासाठी वापरण्यात येत आहे.
 
या प्रक्रियेद्वारे खालील पद्धतीने ही फसवणूक केली जाते... 
 
1. खातेदार एखादी वस्तू विकण्यासाठी ओएलएक्स (olx), फेसबुक यांसारख्या सोशल साईटवर जाहिरात प्रसारित करतो अथवा ऑनलाईन लॉटरी (Online Lottery)च्या साईटवर रजिस्टर करतो.
2. खरेदीदाराच्या/अनोळखी व्यक्तीच्या वतीने आपण खात्रीशीर (authentic) आहोत, असे भासवून खरेदीसाठी किंवा लॉटरी लागल्याचा फोन केला जातो.
3. पैसे देण्यासाठी फोनवरून तुमचा युपीआय आयडी (UPI ID) मागितला जातो. जर तुम्हाला युपीआयबद्दल काहीही माहिती नसेल, तर समोरची व्यक्ती तुम्हाला युपीआय चे अॅप डाऊनलोड करून, त्यावर रजिस्ट्रेशन करून युपीआय चा पिन (Pin) सेट करण्यापर्यंत सर्व सहकार्य करते.
4. नंतर ती व्यक्ती तुम्हाला पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी म्हणून सांगून त्यांच्या अॅपवरून कलेक्ट रिक्वेस्ट (collect request) पाठवते.
5. खातेदाराला युपीआयच्या कलेक्ट रिक्वेस्टबद्दल बद्दल काहीही माहिती नसते. अशा वेळी तो आलेला मेसेज बघून त्याच्याकडून अॅपमधे कलेक्ट रिक्वेस्ट उघडली जाते. (ओपन केली जाते).
6. ही प्रक्रिया झाल्यानंतर फोनवरून खातेदाराला सूचना दिली जाते, की पैसे पाठवले आहेत, तरी कृपया रक्कम चेक करून स्वीकार करावा.
7. समोरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून खातेदार आलेली रिक्वेस्ट (request) ही युपीआय पिन (UPI pin) टाकून स्वीकारतो. 
8. पुढील काही क्षणात पैसे ट्रान्स्फर झाल्याचा मेसेज येतो, पण ते पैसे खातेदाराला मिळालेले नसतात, तर याऐवजी त्याच्या खात्यामध्ये कमी होऊन (debit पडून) समोरच्या व्यक्तीला मिळालेले असतात.
अशा प्रकारची फसवणूक ही खातेदाराच्या युपीआयबद्दलच्या अज्ञानामुळे होऊ शकते.
 
काय काळजी घ्यावी? 
 
1. खातेदाराला युपीआय(UPI)बद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
2. कोणाच्याही सांगण्यावरून युपीआय पिन (UPI pin) टाकून व्यवहार पूर्ण करू नये.
3. कलेक्ट रिक्वेस्ट (Collect request)साठी युपीआय पिन टाकावा लागत नाही, याची नोंद घ्यावी. तसेच कलेक्ट रिक्वेस्ट ही पैसे घेण्यासाठी वापरली जाते, हे लक्षात ठेवावे.
4. युपीआय पिन फक्त पैसे पाठ्विण्यासाठीच वापरावा लागतो.
5. एटीएम कार्डचे तपशील (ATM card details) जसे की कार्ड नंबर, कार्ड मूदत, कार्ड पिन (card number, expiry date, ATM pin) ही माहिती कोणालाही शेअर करू नये, कारण युपीआय पिन (UPI pin) सेट करण्यासाठी ही माहिती लागते.