संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू होण्यापूर्वी वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये, अपहरण करून अपहृत व्यक्तीची सोडवणूक करण्यासाठी खंडणीची मागणी केल्याबाबत व काही वेळा खंडणी देऊनही अपहृत व्यक्तीची हत्या केल्याच्या बातम्या असायच्या. डिजिटलायझेशनचे प्रमाण वाढत गेले आणि संगणकाच्या वापरात वाढ झाल्यानंतर याच खंडणी मागण्याच्या पद्धतीत बदल झाला. त्यातलाच एक प्रकार म्हणजे
रॅन्समवेअर अटॅक (Ransomware Attack) होय.
काय काळजी घ्यावी
१. कोणत्याही अनोळखी व्यक्ती/संस्था यांच्याद्वारे मेलवर प्राप्त झालेल्या किंवा इंटरनेटवर माहिती शोधत असताना उपलब्ध झालेल्या परंतु खात्री नसलेल्या किंवा अज्ञात लिंकवर क्लिक करू नये.
२. अज्ञात/अनोळखी व्यक्तीकडून प्राप्त झालेल्या ईमेलला जोडलेली अविश्वासू फाईल डाऊनलोड करू नये.
३. कोणतीही माहिती, फाईल किंवा अॅप इंटरनेटवरून डाऊनलोड करताना खात्रीशीर वेबसाईटवरून डाऊनलोड करावे.
४. नामांकित वेबसाईट आपण ओळखू शकतो त्याचे विश्वासाचे मार्कर असतात. वेबसाईटच्या लिंकच्या सुरवातीला ‘http’ ऐवजी ‘https’ असा उल्लेख केलेला आहे याची खात्री करावी.
५. काही लिंकच्या शेवटी लॉक किंवा शिल्ड चिन्हाचा वापर केलेला असतो. अशा लिंक नामांकित वेबसाईट म्हणून गणल्या जातात त्याची खात्री करावी.
६. अज्ञात स्रोत किंवा व्यक्तीकडून प्राप्त झालेल्या फोन कॉल, एसएमएस किंव ई-मेलला वैयक्तिक माहिती शेअर करू नये.
७. संगणकावर अद्ययावत पेड अँटिव्हायरस (Antivirus) इन्स्टॉल करावे व प्राप्त झालेल्या ई-मेल व त्यासोबत प्राप्त झालेल्या फाईल्स अँटिव्हायरसच्या मदतीने योग्य प्रकारे स्कॅन करून घ्याव्यात.
८. अनोळखी व्यक्ती/स्रोताकडून प्राप्त झालेल्या अज्ञात पेन ड्राईव्हचा वापर करू नये.
९. संगणकावरील सॉफ्टवेअर व ऑपरेटिंग सिस्टीम अद्ययावत ठेवावी. सॉफ्टवेअर व ऑपरेटिंग सिस्टिम उत्पादकाने वेळोवेळी उपलब्ध करून दिलेले पॅचेस अद्ययावत करावेत.
१०. सुरक्षित सॉफ्टवेअरचा वापर करावा.
११. सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या मोफत वाय-फायचा वापर टाळावा.
१२. संगणकावरील महत्त्वाच्या सर्व फाईल्सच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी त्यांचा बॅकअप घेऊन ठेवावा.