सलामी अटॅक किंवा सलामी टेक्निक (याला सलामी स्लाइसिंग देखील म्हटले जाते) म्हणजे संगणक प्रणालीमध्ये बदल किंवा द्वेषयुक्त प्रोग्राम समाविष्ट करणे आणि आर्थिक फायद्यासाठी याचा वापरत करणे. सलामी हल्ला हा एक किरकोळ हल्ला मानला जातो पण बऱ्याच वेळा त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. अशा हल्ल्याचा उपयोग आर्थिक गुन्हे करण्यासाठी केला जातो.
अशा प्रकारचे हल्ले सामान्यतः आर्थिक संस्थांवर होतात. सलामी टेक्निकचा वापर खात्यातून किरकोळ रक्कम अन्यत्र वर्ग करण्यासाठी केला जातो. सामान्य खातेदाराच्या मानसिकतेचा विचार केल्यास जेव्हा खातेदार बँक खात्याचे स्टेटमेंट घेतो तेव्हा अपवादात्मक मोजक्या व्यक्ती सोडल्यास अन्य कोणीही खात्यातील शेवटच्या पैशाची नोंद घेत नाहीत. उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या खातेदाराचे जानेवारी महिन्याचे स्टेटमेंटमध्ये खात्यातील शिल्लक रक्कम रु. १२,३००.२७ (रु. बारा हजार तीनशे पैसे सत्तावीस) इतकी होती आणि पूर्ण फेब्रुवारी महिन्यात खात्यावर कोणताही व्यवहार झालेला नसताना फेब्रुवारी अखेरच्या स्टेटमेंटमधील खात्यातील शिल्लक रक्कम र. १२,३००.२० (रु. बारा हजार तीनशे पैसे वीस) इतकी आहे किंवा खात्यात व्यवहार झाले पण कोणताही व्यवहार पैशातील रकमेने झालेला नाही तरी सुद्धा शिल्लक रक्कम सात पैशांनी कमी झाली आहे. अशाच प्रकारे ज्या खातेदारांचे खात्यात पैशात रक्कम दिसत आहे त्यातून पैशातील रक्कम काढून घेतली जाते. काहीवेळा हि रक्कम पैशातील नसून रुपयातील सुद्धा असू शकते. बँक खात्यात नावे पडलेली प्रत्येक रक्कम हि कोणत्याना कोणत्या खात्यात जमा होत असते. जमा नावे जुळल्याशिवाय कोणताच व्यवहार पूर्ण होत नाही. जेव्हा असा हल्ला केला जातो तेव्हा सर्व व्यवहार संगणक प्रणालीद्वारे होत असल्याने हे व्यवहार संगणक प्रणालीच पास करते. त्यामुळे असे व्यवहार पटकन लक्षात येत नाहीत.
आपण दुर्लक्ष केल्यामुळे हल्लेखोराचा फायदा होतो. सलामी हल्ला करणारी व्यक्ती “थेंबेथेंबे तळे साचे” ह्या म्हणीनुसार स्वतःचा फायदा करून घेते.
काय काळजी घ्याल
१. नियमितपणे बँकेतून खात्याचे पासबुक भरून घेण्यास किंवा स्टेटमेंट घेण्यास विसरू नका.
२. तुम्ही केलेले व्यवहार व पासबुक किंवा स्टेटमेंटमधील उल्लेखित व्यवहारांची तपासणी करा.
३. खाते व्यवहाराबाबत कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच सदर बाब बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्या.
४. खाते व्यवहाराची माहिती मिळण्यासाठी एसएमएस तसेच ई-मेल अॅलर्ट मिळण्यासाठी बँकेकडे नोंदणी करा.