सध्या आपलं प्रत्येकाचंच आयुष्य एक तारेवरची कसरत बनलेलं आहे. वेळेचा अभाव आणि कामांची जंत्री यामुळे कधी दिवस संपतो कळतच नाही. त्यामुळे साहजिकच अचूक वेळेवर न घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आपल्याला भविष्यात भोगावा लागतो. ही बाब अगदी उदाहरणासह 'पंचतंत्रात' योग्य प्रकारे मांडली आहे, विशेष म्हणजे ती आजच्या जमान्यातही लागू पडते. बघा वाचून, तुमच्याही बाबतीत कदाचित असच घडतं असेल...
एका तलावात सहस्त्रबुद्धी आणि शतबुद्धी नावाचे दोन मासे राहत होते. या दोन्ही माशांचा जवळचा मित्र बेडूक होता. ज्याचे नाव एकबुद्धी असे होते. बेडूक हा माशांप्रमाणे दिसायला तर मोठा नव्हता मात्र त्याची बुद्धी आणि निर्णय क्षमता अतिशय तल्लख होती. हे तिन्ही मित्र आपला बराचसा वेळ एकत्र घालवत असे. एके दिवशी संध्याकाळी अशाच निवांत गप्पा मारताना दोन मच्छिमार त्यांच्या तलावाच्या जवळून जातांना सहस्त्रबुद्धी, शतबुद्धी आणि एकबुद्धी यांना दिसले. यावेळी मच्छिमारांच्या हातात पकडलेले मासे होते. चालता-चालता मच्छिमारांमध्ये संवाद सुरु होता. ते म्हणाले, ''आज या तलावात मासे आहेत मात्र पाणी जास्त दिसत नाही. उद्या पाण्याची पातळी जरा वाढेल, त्यावेळी आपण येऊन या तलावातील मासे पकडून नेऊ.''
मच्छिमारांचं हे बोलणं ऐकून सहस्त्रबुद्धी हसून म्हणाला, ''घाबरू नका मित्रांनो हे मच्छिमार उद्या येणार नाहीत आणि आले तरी आपल्या चपळ बुद्धीने आणि पोहोण्याच्या कलेने आपण त्यांना चांगलाच धडा शिकवू.'' हे ऐकून शतबुद्धी माशाने देखील सहस्त्रबुद्धीला साथ दिली आणि तो देखील सहमत झाला. मात्र एकबुद्धी बेडूक म्हणाला, ''मित्रांनो माझ्याकडे एकच प्रतिभा आहे आणि ती म्हणजे मी धोका आणि वेळ यातील फरक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. तुम्ही इथे राहू शकता मात्र, मी आजच माझ्या कुटुंबासोबत जवळच्या तलावात जाण्यासाठी प्रस्थान करतो.''
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ते दोन्ही मच्छिमार आले आणि त्यांनी तलावात जाळे टाकले. यावेळी बरेच बेडूक, मासे आणि खेकडे मच्छिमारांनी पकडले. या जाळ्यातून वाचण्यासाठी सहस्त्रबुद्धी आणि शतबुद्धी यांनी आटोकाट प्रयत्न केले मात्र शेवटी ते दोघंही या जाळ्यात अडकलेच. मच्छिमारांनी सगळे मासे गोळा केले, मात्र सहस्त्रबुद्धी व शतबुद्धी हे दोन्ही मासे मोठे असल्याने या दोघांना त्यांनी आपल्या खांद्यावर घेतले आणि आपल्या घरी निघाले. मच्छिमार घरी जात असताना एकबुद्धीला आपले दोन्ही मित्र मच्छिमारांच्या खाद्यांवर दिसले. हे पाहून तो उदास झाला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, ''सहस्त्रबुद्धी आणि शतबुद्धी माझ्यापेक्षा बुद्धीमान होते मात्र वेळेचे महत्व त्यांनी ओळखले नाही. ती ओळखण्याची प्रतिभा माझ्यात असल्याने आज मी दुसऱ्या तलावात आपल्या कुटुंबियांसोबत आनंदात पोहू शकत आहे.''
तात्पर्य :
मित्रांनो, सध्या आपल्या आयुष्यातही असे प्रसंग येतच असतील. मग ते प्रसंग कधी वैयक्तिक असतात तर कधी नोकरी व्यवसायातील असतात. नोकरी करताना जर व्यवसायाचा विचार मनात येत असेल किंवा व्यवसाय करताना मोठ्या व्यवसायाची स्वप्न बघत असाल तर हिच ती योग्य वेळ आहे. असलेल्या परिस्थिती आपोआप सुधारणा होतील अशी अपेक्षा ठेऊन तिथेच थांबलात तर प्रगती होणे, किंवा आयुष्यात यशस्वी होण्याच्या संधी तुम्ही गमावत आहात. तुम्हाला असे निर्णय घेताना आर्थिक अडचणींचा प्रश्न भेडसावत असेल तर एकदा फक्त जनता सहकारी बँकेची संपर्क साधा, आम्ही तुमची ही अडचण सुद्धा दूर करू. पण आता तुम्हीच ठरवा योग्य वेळी अचूक निर्णय घेऊन एकबुद्धी बनायचं की वेळ मारून नेऊन सहस्त्रबुद्धी किंवा शतबुद्धीच्या मार्गावर जायचं...
_अजिंक्य कुलकर्णी
९३७१०६८५१३